
दौंड : प्रतिनिधी
पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका पशुवैद्यकीय डॉक्टरने पत्नीसह आपल्या दोन मुलांचा खून करून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत पती-पत्नीचे मृतदेह घरातच आढळून आले. मात्र घरापासून जवळच असलेल्या विहिरीत टाकलेले मुलांचे मृतदेह काढण्यासाठी कसरत करावी लागली. तब्बल ४५ फुट खोल पाणी असलेल्या या विहीरीतून रात्री उशीरा हे मृतदेह काढण्यात आले. पती-पत्नीच्या वादात निष्पाप मुलांचा जीव गेल्याचं पाहून संपूर्ण वरवंड गाव हळहळलं.
मंगळवारी दौंड तालुक्यातील वरवंड येथील डॉ. अतुल शिवाजी दिवेकर यांनी आपली पत्नी पल्लवी (वय ३५) यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलगा अद्वित (वय ११) आणि मुलगी वेदांतिका (वय ७) या दोघांना विहिरीत टाकून दिले होते. हे मृतदेह शोधण्याचा पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केला. परंतु विहिरीत ४५ फुटापर्यंत पाणी असल्यामुळे मृतदेह शोधण्यात अडचणी येत होत्या.
या चिमूरड्यांचे मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अंधार पडू लागल्यामुळे आणि पाणी जास्त असल्यामुळे मृतदेह काढायचा असा प्रश्न पडला होता. त्यामुळे पोलिसांनी पुण्यातून काही लोकांना पाचारण केले. त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करत रात्री उशीरा या निष्पाप जीवांचे मृतदेह बाहेर काढले. या मुलांचे मृतदेह पाहून उपस्थित ग्रामस्थ अक्षरश: हेलावून गेले होते.
दरम्यान, पत्नीकडून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे डॉ. अतुल दिवेकर यांनी हे पाऊल उचलल्याची चिठ्ठी मिळाली आहे. मात्र नेमका वाद काय होता हे अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या डॉ. दिवेकर यांनी हे पाऊल का उचललं याबाबत ग्रामस्थांसह नातेवाईकांना कोडं पडलं आहे.