Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : शरद मोहोळचा ‘या’ कारणामुळे झाला गेम; पोलिसांच्या सखोल तपासानंतर मुख्य सुत्रधार निष्पन्न..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यात खळबळ उडवून देणाऱ्या कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात नविन अपडेट समोर येत आहे. या हत्येचा सुत्रधार तिसराच व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी पनवेल मधून अटक केलेल्या विठ्ठल शेलार याचा शरद मोहोळ याच्याशी काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यातून गोळीबारही झाला होता. याच वादाच्या रागातून विठ्ठल शेलार याने शरद मोहोळचा गेम केल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यात शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी कोथरुडच्या सुतारदरा परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात गोळीबार करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास आल्यानंतर आणखी काहीजणांना अटक करण्यात आली.

काल पुणे पोलिसांनी पनवेल आणि वाशी परिसरातील एका फार्म हाऊसमधून विठ्ठल शेलार, रामदास मारणे यांच्यासह अकराजणांना अटक केली. या प्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ या दोघांमध्ये पुणे-मुंबई महामार्गालगत वाद झाल्याचे समोर आले. यामध्ये दोन्ही टोळ्या आमनेसामने येवून गोळीबाराची घटनाही घडली होती. त्यावेळी विठ्ठल शेलार हा पळून गेल्यामुळे त्याचा जीव वाचला होता.

या वादाच्या रागातूनच विठ्ठल शेलार याने आपल्या साथीदारांच्या मदतीने शरद मोहोळची हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विठ्ठल शेलार हा भाजपचा पदाधिकारी असून त्याच्यावर खूनासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळला मारण्यासाठी दिड वर्षांपासून प्लॅन करत होता अशीही माहिती समोर आली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version