पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळ परिसरात १४ ते १७ जुलैदरम्यान कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील काही तालुके वगळता अन्यत्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
या आदेशानुसार गड किल्ले, पर्यटन स्थळ, येथील अपघात रोखण्यासाठी पर्यटकांना प्रतिबंध असणार आहे. विशेषतः भोर, वेल्हा, मुळशी, जुन्नर, मावळ, आंबेगाव या तालुक्यातील गड किल्ले, पर्यटन स्थळी बंदी असणार आहे. १७ जुलै पर्यत कलम १४४ लागू असणार आहे.
या आदेशानुसार संबंधित प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटकाना जाण्यास मनाई असणार आहे. तसेच पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्यामुळे पर्यटकांना १ किमी अंतरावरच रोखले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कलम १८८ नुसार कारवाई केली जाणार आहे.