पुणे : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार जीवघेणा ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील एका शाळेत ६० विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज दुपारी शालेय पोषण आहारांतर्गत भात दिला जातो. नेहमीप्रमाणे आजही तब्बल १०० विद्यार्थ्यांना हा भात देण्यात आला. भात खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाला. जवळपास ६० विद्यार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागले.
विद्यार्थ्यांना त्रास होवू लागल्यामुळे तत्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला अधिक त्रास झाला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, या घटनेनंतर राजगुरुनगर परिसरात एकच खळबळ उडाली. पालकांनीही या प्रकाराबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त करत आमच्या मुलांच्या जीवाशी खेळू नका असे खडे बोल सुनावले.