
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवतीवर प्रेमसंबंधाला नकार दिल्यामुळे तिच्याच मित्राने भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत हा प्रकार घडला असून या ठिकाणच्या तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणीचा जीव वाचला आहे. या हल्लेखोर युवकाला नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत माहिती अशी की, आज सकाळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी एक युवती आपल्या मित्रासमवेत सदाशिव पेठेतून दुचाकीवरून जात होती. त्यावेळी शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) हा युवक हातात कोयता घेऊन दबा धरून बसला होता. हे दोघेही जवळ येताच शंतनूने दोघांना अडवत वाद घालण्यास सुरवात केली. त्यावेळी त्याने दोघांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारानंतर या दोघांनीही जिवाच्या आकांताने पळ काढला. मात्र मागे कोयताधारी युवकाला पाहून कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. या दरम्यान, संबंधित हल्लेखोर युवकाने या युवतीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लेशपाल जवळगे नावाचा युवक मदतीला धावला. त्याने कोयता पकडून धरत हल्लेखोर युवकाला रोखण्यात यश मिळवले. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत या हल्लेखोराला चोप दिला.
विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित युवकाला अटक केली आहे. दरम्यान, प्रेमसंबंधांना नकार दिल्यामुळे हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. विश्रामबाग पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.