दौंड : प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या दौंडमधील आत्महत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. भीमा नदीच्या पात्रात मिळालेल्या सात व्यक्तींचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे सातही खून चुलत भावानेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहणाऱ्या पवार आणि फुलावरे कुटुंबातील महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचे सात मृतदेह दौंड तालुक्यातील पारगाव मधील भीमा नदी पात्रात आढळून आले होते.हत्या की आत्महत्या याबाबत शंका कुशंका उपस्थित होत होत्या. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. सुरुवातीला कुटुंबातील मुलाने एका नात्यातील मुलीला पळवून नेल्यामुळे ही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र अधिक तपास केल्यानंतर हा हत्येचा प्रकार असल्याचे समोर आले आहे.
या घटनेतील मयत मोहन पवार यांच्या चुलत भावानेच हे खून केल्याचे समोर आले आहे. मोहन पवार यांच्या मुलासोबत चुलत भावाचा मुलगा गेला होता. त्यावेळी त्यांचा अपघात झाला होता. मात्र ही बाब चुलत भावाला सांगण्यात आली नव्हती.अपघाताच्या चार दिवसानंतर चुलत भावाला माहिती मिळाली. दरम्यानच्या काळात अपघातग्रस्त मुलाचा मृत्यू झाला. याचाच राग मनात धरून चुलत भावानेच मोहन पवार व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करून त्यांचे मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मोहन उत्तम पवार ( वय ४८ ), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८) आणि रितेश फुलवरे (७) कृष्णा फुलवरे (४) छोटू फुलवरे (३) अशी मृतांची नाव आहे. पवार आणि फुलवरे कुटुंबीय अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावात वास्तव्यास होते. या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.