Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड पोलिसांच्या ताब्यात; पनवेल, वाशी परिसरात मोठी कारवाई

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात नविन ट्विस्ट समोर आला आहे. या हत्या प्रकरणात वेगळाच मास्टरमाईंड असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी पनवेल, वाशी येथे छापे टाकून रामदास उर्फ वाघ्या मारणे, विठ्ठल शेलार याच्यासह जवळपास दहाजणांना ताब्यात घेतले आहे.

शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी पुण्यातील कोथरुड येथील सुतारदरा परिसरात भरदिवसा गोळ्या झाडून शरद मोहोळ याची हत्या करणात आली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासात आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर आणखी काही आरोपी पोलिसांच्या हाती लागले होते. जवळपास तेराजणांना आतापर्यंत पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेच्या तपासादरम्यान, शरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे, विठ्ठल शेलार यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पनवेल आणि वाशी परिसरातील फार्म हाऊसवर थांबलेल्या मारणे आणि शेलारसह जवळपास दहाजणांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली असून उद्या या आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नव्याने अटक केलेल्या आरोपींमध्ये तीन मुख्य आणि तीन संशयित आहेत. या घटनेनंतर सर्वजण वाशी, पनवेल परिसरात लपून बसले होते. दरम्यान, आतापर्यंत साहिल उर्फ मुन्ना पोळेकर यानंच हा कट रचल्याचं बोललं जात होतं. मात्र आता पोलिस तपासात नविनच नावे पुढे आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version