सासवड : प्रतिनिधी
पुणे शहरानजीकच्या दिवे घाटात आज चक्क एका बिबट्याने दहशत निर्माण केली. अज्ञात वाहनांच्या धडकेत जखमी झालेल्या या बिबट्यानं काही काळ दिवे घाटात ठाण मांडलं होतं. त्यामुळं घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, बिबट्याच्या वावराची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने शोध मोहिमेला सुरुवात केली आहे.
आज दुपारी दिवे घाटात एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे हा बिबट्या जखमी झाला होता. सुरुवातीला हा बिबट्या घाटातच बसलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर हा बिबट्या रस्त्याने फिरताना अनेकांनी पाहिले. काही दुचाकीस्वारांच्या अगदी जवळून हा बिबट्या शांतपणे गेला. बिबट्याच्या वावरामुळे बराच काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अज्ञात वाहनाच्या धडकेत हा बिबट्या जखमी झाल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. अधिक माहिती घेतल्यानंतर हा बिबट्या घाटाच्या खालच्या बाजूने मस्तानी तलावाच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली आहे. बिबट्याच्या वावराबद्दल माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने शोध मोहिमेला सुरुवात केली आहे. त्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला आहे. मात्र अद्याप हा बिबट्या सापडलेला नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
वनविभागाकडून या बिबट्याच्या शोधासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यानुसार उशीरापर्यंत या बिबट्याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती सासवडचे वनविभागाचे प्रमुख व्ही. एस. चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, अचानकपणे बिबट्याचं दर्शन घडल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.