
सासवड : प्रतिनिधी
येत्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येवून ठेपल्या आहेत. अशातच विरोधकांकडून ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केल्या जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासवड येथील पुरंदर तहसील कार्यालयातून तीन अज्ञात व्यक्तींनी ईव्हीएम मशीन चोरून नेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन कामाला लागले आहे. अशात पुणे जिल्ह्यातील सासवड येथील पुरंदर तहसील कार्यालयाच्या गोदामातून ईव्हीएम मशीन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. आज ही घटना उघड झाली असून चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. संबंधित आरोपी तहसील कार्यालयाच्या गोदामातून चोरी करताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
या प्रकरणी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, येथील तहसील कार्यालयाच्या गोदामात ४० ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक डेमो युनिट चोरून नेण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रशासकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली असून चोरट्यांनी थेट ईव्हीएम मशीनच चोरून नेल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.