Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : इंदापुरमधील ३ कोटी ६० लाखांच्या दरोड्याचा ७२ तासांत उलगडा; पुणे ग्रामीण पोलिसांचे यश

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुकनजीक  गोळीबार करत ३ कोटी ६० लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी छडा लावला आहे.  स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिसांनी ७२ तासात या एकूण सहा आरोपींना जेरबंद केले आहे. या आरोपींकडून १ कोटी ४३ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत माहिती अशी की, दि. २६ ऑगस्ट रोजी कुरीयर व्यावसायिक भावेशकुमार अमृत पटेल (रा.कहोडा, ता.उंझा जिल्हा मेहसेना,गुजरात) हे नांदेड, लातूर व सोलापूर येथील पार्सल घेऊन जात होते. त्यावेळी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास इंदापूर येथील वरकुटे पाटी येथील गतिरोधकाजवळ लोखंडी रॉड दाखवत गाडी थांबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र पटेल यांनी तिथून भरधाव वेगात आपले वाहन पुढे नेले.

या दरम्यान, दोन चारचाकी वाहनानी पाठलाग करीत पटेल यांच्या स्कॉर्पिओवर बंदुकीतून गोळीबार करत एक कार आडवी मारली. भावेश पटेल यांच्यासह विजयाभाई सोलंकी याना मारहाण करत या आरोपींनी मोबाईल, रोख रकमेसह एकूण ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपयांचा लुटून नेला होता. याबाबत इंदापूर पोलिस ठाण्यात सहा अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना तपासाबाबत सूचना केल्या. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देत तपासचक्रे फिरवली. सहा पथके तयार करून या दरोड्याचा तपास सुरू करण्यात आला.  त्यानुसार सागर शिवाजी होनमाने (रा. कुर्डवाडी ता.माढा जि. सोलापूर) याने त्याच्या इतर साथीदारांसह सदर गुन्हा केल्याचे तपास पथकाला समजले.

तपास पथकाने संशयित इसम सागर शिवाजी होनमाने (वय ३४) याच्यासह बाळू उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम (वय ३२, रा.कुर्डूवाडी ता.माढा जि.सोलापूर) व रजत अबू मुलाणी (वय २४, रा. न्हावी ता. इंदापूर) यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यामध्ये त्यांनी इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान, या तपासात सागर होनमाने याच्याकडे ७२ लाख व रजत अबू मुलाणी याच्याकडे ७१ लाख २० हजार रुपये असे एकूण १ कोटी ४३ लाख २० हजार रुपये मिळून आले.

या दरोड्यातील इतर आरोपी हे परराज्यात गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन पथके राजस्थानला पाठवण्यात आली. यामध्ये गौतम अजित भोसले (वय ३३,रा.वेणे ता. माढा जि. सोलापूर), किरण सुभाष घाडगे (वय २६, रा.लोणी देवकर ता.इंदापूर) व भूषण लक्ष्मीकांत तोंडे (वय २५, रा.लोणी देवकर ता. इंदापूर) यांना राजस्थानमधील उदयपूर येथील प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, गणेश जगदाळे, रविराज कोकरे तुषार पंदारे, बाळासाहेब करांडे, सचिन घाडगे, अजय घुले, जनार्दन शेळके, राजू मोमीन, विजय कांचन, आसिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे,अक्षय नवले, प्रमोद नवले, जयेश पाथरकर, रवींद्र पाटमास,कल्याण खांडेकर, इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार,महेश माने, सुधीर पाडूळे, सलमान खान, विशाल चौधर, सुरेंद्र वाघ, कल्याण खांडेकर, मनोज गायकवाड, सचिन बोराडे, मोहम्मद अली मडडी, बापू मोहिते, लक्ष्मण चोरमले, विनोद काळे, सुरज गुंजाळ, यांच्यासह राजस्थान येथील पोलीस निरीक्षक दर्शन सिंग राठोड,पोलीस हवालदार बुटी रामा, गोविंद सिंग, पोलीस कॉन्स्टेबल रुद्र प्रताप सिंग यांचा या तपास पथकात सहभाग होता.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version