
जेजूरी : प्रतिनिधी
जेजुरीमध्ये आयोजित करण्यात आलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गुरुवार दि. १३ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे एकत्रित उपस्थित राहणार होते. मात्र मंत्रीमंडळ विस्तार आणि अन्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच पुणे जिल्ह्यातील जेजूरीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. या ठिकाणी नागरिकांना पावसाचा त्रास होऊ नये यासाठी मोठा मंडपही उभारण्यात आला होता. विशेष म्हणजे, प्रत्येक तालुक्यातील नागरिकांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती.
राज्यातील राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच पुणे जिल्ह्यात येणार होते. पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जेजूरीत होत असलेला कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला होता. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात हा कार्यक्रम आयोजित केला जाईल अशी माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम नेमका कधी होतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.