भोर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. गुंजवणी नदीपात्रातील पाण्यात मोटर ढकलत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भोर तालुक्यातील निगडे या गावात घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेत एका पिता-पुत्राचाही दुर्दैवी अंत झाला आहे.
विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. आज सकाळी हे चौघेजण नदीत इलेक्ट्रिक मोटर ढकलत होते. त्यावेळी अचानक वीजप्रवाह सुरू झाला. या घटनेत चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेपूर्वी सहावेळा वीजप्रवाह खंडित झाला होता अशी माहिती समोर येत आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या चौघांना जीव गमवावा लागल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर चौघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, घटनास्थळी महसूल, महावितरण, आरोग्य विभागासह राजगड पोलिस दाखल झाले आहेत.