
जेजूरी : प्रतिनिधी
जेजूरीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची जमिनीच्या वादातूनच कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पानसरे यांच्यासह अन्य दोनजणांवर वार करण्यात आले. या प्रकरणी जेजूरी पोलिसांनी तिघा पिता-पुत्रांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
वणेश प्रल्हाद परदेशी, किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी (रा. बेदवस्ती, जेजूरी) या तिघा पितापुत्रासह अन्य पाच जणांवर जेजूरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी मेहबूब पानसरे हे आपल्या दोन सहकाऱ्यांसमवेत धालेवाडीनजीक असलेल्या आपल्या शेतजमिनीत सुरू असलेल्या मशागतीच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी वणेश परदेशी याचा पानसरे यांच्याशी जमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून वाद झाला.
या दरम्यान, वणेश परदेशी व त्याच्या दोन मुलांसह अन्य पाचजणांनी मेहबूब पानसरे व त्यांच्या अन्य दोन सहकाऱ्यांवर कुऱ्हाडी व कोयत्याने वार केले. यात पानसरे यांच्यासह त्यांचे सहकारी गंभीररीत्या जखमी झाले. पानसरे यांच्या मानेवर खोलवर वार झाल्याने त्यांना जेजूरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची परिस्थिती पाहता त्यांना पुण्याला हलवण्यात आले. अति रक्तस्त्रावामुळे पानसरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर जेजूरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी भरडे, जेजूरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली. या घटनेनंतर जेजूरी पोलिसांकडून आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजूरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.