आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

BIG BREAKING : इंदापूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला; वाचा इंदापूर शहरातील संविधान चौकात नेमकं काय घडलं..?

पुणे
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या वाहनावर आज सकाळी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नंबर नसलेल्या वाहनातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी मिरचीची पूड टाकत लोखंडी गजाने शासकीय वाहनावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदैवाने या हल्ल्यातून तहसीलदार श्रीकांत पाटील हे बचावले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर इंदापूर पोलिसांनी सर्व बाजूंनी नाकाबंदी करत आरोपींच्या शोधाला सुरुवात केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे आपल्या शासकीय वाहनातून (क्र. एमएच ४२ एएक्स १६६१) जुन्या पुणे-सोलापूर मार्गावरून प्रशासकीय भवनाकडे निघाले होते. या दरम्यान, संविधान चौकात एका नंबरप्लेट नसलेल्या वाहनातून आलेल्या ४ ते ५ हल्लेखोरांनी तहसीलदारांचे चालक मल्हारी मखरे यांच्या अंगावर मिरचीची पूड टाकत लोखंडी गजाने वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यातून तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांचे चालक सुदैवाने बचावले आहेत.

या घटनेत तहसीलदारांच्या शासकीय वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या वाहनाच्या काचाही फुटल्या आहेत. प्रशासकीय भवनापासून अवघ्या काही अंतरावर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर इंदापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत ठिकठिकाणी नाकेबंदी करत आरोपींच्या शोधाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी फिर्याद दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे.

दरम्यान, श्रीकांत पाटील हे आपल्या कार्यपद्धतीमुळे सर्वत्र ओळखले जातात. अवैध वाळू उपशासह अनेक गैरप्रकारांना आळा घालण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर झालेला हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला आणि कोणी केला याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करा : आमदार दत्तात्रय भरणे

या घटनेनंतर आमदार दत्तात्रय भरणे यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती घेतली. या घटनेतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना पोलिस प्रशासनाला देत त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याबाबत घडलेली ही घटना धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अधिकाऱ्यांवरील भ्याड हल्ले खपवून घेणार नाही : हर्षवर्धन पाटील

राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या घटनेबद्दल निषेध नोंदवत तातडीने आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस यंत्रणेला दिल्या आहेत. अशा प्रकारे चांगल्या अधिकाऱ्यावर हल्ला होणे ही बाब अत्यंत चुकीची आहे. अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असेही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us