Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : शेतकऱ्यांचा वाद विकोपाला; पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच वकिलाने केली शेतकऱ्याला बेदम मारहाण

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच एका शेतकऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. एका वकिलाने शेतकऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित शेतकऱ्याला रक्त निघेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजेंद्र दिनकर चव्हाण असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  याबाबत माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाईच्या दोन शेतकऱ्यांच्या गटात जमिनीवरून वाद सुरू आहे. याबाबत आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होती.  जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर हे दोन्ही गट थांबले होते. त्यावेळी अचानक त्यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली.

त्यातून एकमेकांना शिवीगाळ सुरू झाली आणि त्याचेच पर्यावसान हाणामारीत झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच गोंधळ सुरू झाला. यावेळी एका वकिलाने थेट शेतकऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत या घटनेची माहिती घेत कारवाई सुरू केली आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातच मारहाणीची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे महत्वाचे ठिकाण असताना तिथे अशा घटना घडतातच कशा असा सवालही उपस्थित होत आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version