पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुणे बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या पॅनलविरोधात भुमिका घेतल्यामुळे दांगट यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिली.
पुणे बाजार समितीची तब्बल १९ वर्षानंतर निवडणुक होत आहे. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घालत पॅनल उभा केला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विकास दांगट यांच्याशी सातत्याने चर्चा करण्यात आली होती. तसेच या निवडणुकीत गांभीर्याने काम करण्याबाबत सुचनाही देण्यात आल्या होत्या.
प्रत्यक्षात विकास दांगट यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या माजी संचालकांसोबत जात राष्ट्रवादीच्या पॅनलविरोधात भुमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रदिप गारटकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विकास दांगट यांची हकालपट्टी केल्याचे जाहिर केले. राष्ट्रवादीचे खडकवासला शहर अध्यक्ष काका चव्हाण, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष त्रिबंक मोकाशे, पुरंदर, हवेली तालुका अध्यक्ष भरत झांबरे आदी यावेळी उपस्थित होते.