
नीरा : प्रतिनिधी
बारामती व पुरंदर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ज्युबिलंट इन्ग्रेव्हीया कंपनीत आज सकाळी स्वच्छतेचे काम सुरू असताना स्फोट झाला आहे. त्यामध्ये चार कामगार जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना पुढील उपचारासाठी लोणंद आणि पुणे येथे हलवण्यात आले आहे.
ज्युबिलंट इन्ग्रेव्हीया कंपनीत आज सकाळी अॅसिड कॉम्प्रेसर प्लांटमध्ये स्वच्छता सुरू होती. त्यावेळी कॉम्प्रेसरमध्ये स्फोट होऊन चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे येत आहे. यातील तिघांना लोणंद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असलेल्या कामगाराला तातडीने पुण्याला हलवण्यात आले आहे.
यापूर्वीही या कंपनीत अशाच स्फोटाची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा प्रकार समोर आल्यानंतर निरेतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.