पुणे : प्रतिनिधी
वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या भिवंडी येथील एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, भरपावसात मोठी कसरत करत स्थानिकांनी या युवकाचा मृतदेह गडावरुन खाली आणला. त्यानंतर इतर सोपस्कार पूर्ण करण्यात आले.
अजय मोहनन कल्लामपारा (वय ३३, रा. भिवंडी, ठाणे) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. तो टाटा कंझ्यूमर लिमिटेड कंपनीत कार्यरत होता. याबाबत सागर किसन माने (रा. वाशिंद, ता. शहापूर) यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. अजय हा आपल्या मित्रांसमवेत काल दि. १४ ऑगस्ट रोजी राजगड किल्ला पाहण्यासाठी आला होता. हे सर्वजण दुपारी साडेतीन वाजता किल्ल्यावर पोहोचले.
सायंकाळी उशीर झाल्यामुळे या सर्वांनी किल्ला न पाहता त्याच ठिकाणी असलेल्या पद्मावती मंदिरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सागर माने यांना जाग आली. तेव्हा शेजारी झोपलेला अजय कल्लामपारा हा दिसला नाही. त्यामुळे सागरसह अन्य मित्रांनी शोधाशोध सुरू केली. मात्र दाट धुक्यामुळे मंदिर परिसरात तो कुठेही आढळून आला नाही.
पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास या सर्वांनी पद्मावती पाण्याच्या टाकीजवळ पाहिले असता त्या ठिकाणी अजयची चप्पल, पाण्याची बाटली आणि टॉर्च ठेवलेली आढळली. त्यामुळे या सर्वांनी इतर पर्यटकांना बोलावून घेत अजयचा शोध घेतला. या टाकीत तो मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वेल्हे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
वेल्ह्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल पी. सी. सोमवंशी, होमगार्ड आर. पी. कचरे यांनी स्थानिकांची मदत घेत मृतदेह बाहेर काढला. पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटेवरून मोठ्या कसरतीने हा मृतदेह किल्ल्यावरून खाली आणण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार योगेश जाधव करीत आहेत.