पुणे : प्रतिनिधी
अलीकडील काळात सोशल मिडियाचा वापर हा सामान्य व्यक्तीही करू लागला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. आता सायबर चोरट्यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला असून अनेक अधिकाऱ्यांच्या नावे बनावट अकाउंट काढून त्याद्वारे फसवणुक केली जात असल्याची बाब समोर आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावानेही असंच बनावट फेसबुक अकाउंट तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
साधारणपणे एखाद्या व्यक्तीच्या नावाने बनावट अकाउंट काढून त्याद्वारे मेसेज करून आर्थिक फसवणूकीचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्याचवेळी बनावट अकाउंटद्वारे ब्लॅकमेल करून त्याद्वारे आर्थिक फसवणूक केल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता सायबर चोरट्यांनी आपला मोर्चा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे वळवला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने एक बनावट फेसबुक अकाउंट काढल्याची बाब समोर आली आहे.
या अकाउंटद्वारे विविध लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही ५ ते ६ वेळा जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट अकाउंट सुरू केल्याचे प्रकार समोर आले होते. त्यावेळी राजेश देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही बनावट खाती बंद झाली. मात्र आता पुन्हा एकदा बनावट अकाउंट बनवण्यात आले आहे. या अकाउंटमध्ये जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचा फोटो वापरण्यात आला असून ते आयएएस अधिकारी असल्याचे या अकाउंटमध्ये नमूद केले आहे.
थेट जिल्हाधिकाऱ्यांची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यामुळे याबाबत शंका उपस्थित होऊ लागली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वीही राजेश देशमुख यांच्या नावाने अकाउंट बनवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावेळी सायबर शाखेकडे तक्रार केल्यानंतरही पुन्हा एकदा नव्याने अकाउंट बनवले गेल्याने या सायबर चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.