पुणे : प्रतिनिधी
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजब फतवा काढला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या परवानगीशिवाय पुणे जिल्ह्यात कोणताही शासकीय कार्यक्रम आयोजित करायचा नाही असे निर्देशच त्यांनी दिले आहेत. त्यानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेश पारित केले आहेत.
महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे चंद्रकांत पाटील चांगलेच चर्चेत आले होते. आता त्यांनी पुणे जिल्ह्यात आपल्या परवानगीशिवाय शासकीय कार्यक्रम घेवू नयेत असा फतवा काढला आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अशा प्रकारचे आदेशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
राज्य सरकारने दिलेल्या निधीतून होणाऱ्या कामांची उद्घाटने, भूमिपूजन अथवा अन्य कोणतेही कार्यक्रम आयोजित करताना पालकमंत्र्यांच्या कार्यालयाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. तशा सुचनाही जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. तसेच परवानगी घेतलेली नसल्यास संबंधित कार्यक्रमाला कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित न राहण्याची तंबीही देण्यात आली आहे.
दुसरीकडे, जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांना पालकमंत्र्यांना निमंत्रण देणे, पत्रिकेत राजशिष्टाचाराप्रमाणे पालकमंत्र्यांचे नाव प्रसिद्ध करणे, कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राजशिष्टाचारानुसार पालकमंत्र्यांची आसन व्यवस्था करावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार त्यांच्या कार्यालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय शासकीय निधीतून होणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नयेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुखांना पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात चंद्रकांतदादांचा ग्रीन सिग्नल असेल तरच शासकीय कार्यक्रम होतील हेच या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.