पुणे : प्रतिनिधी
सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले संभाजी भिडे यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भिडे यांच्यावर पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोलवडीत आयोजित सभेच्या आयोजकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे शहरानजीक असलेल्या कोलवडी येथे शनिवारी सायंकाळी संभाजी भिडे यांची सभा झाली होती. या सभेत बोलताना भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली होती. याच सभेत त्यांनी राष्ट्रीय ध्वजाबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे आता लोणीकंद पोलिस ठाण्यात भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलवडीत झालेल्या या सभेच्या आयोजकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या सभेत अनेक मुद्यांवर संभाजी भिडे यांनी भाष्य केले. त्यामध्ये दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांचाही समावेश आहे. यापूर्वीही भिडे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये करत सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच आता नव्याने भर पडली असून नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे भिडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शनिवारी कोलवडीत बोलताना भिडे यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीवरही टीका केली. ही बैठक कौरवांच्या वंशांची असल्याचं वक्तव्य भिडे यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.