दौंड : प्रतिनिधी
पुणे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातल्या पोलिस दलासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारामतीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी व सध्याचे पुण्यातील उपायुक्त नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, फौजदार पद्मराज गंपले व मोरगावचे माजी सरपंच पोपट उर्फ कैलास तावरे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २८ सप्टेंबर रोजी रात्री यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बारामती तालुक्यातील शेतजमीनीच्या खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर मुख्य आरोपीला पोलिसांनी वाचविण्याचा प्रयत्न केला व त्याच्यावर गुन्हा शाबित होत नाही असे सिध्द करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार घेऊन दौंड न्यायालयात वरील पोलिस अधिकारी व आरोपी पोपट तावरे याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने वरील आदेश दिला होता. त्यानंतर तक्रारदार आरती लव्हटे व किरण भोसले यांच्या वतीने पुन्हा नव्याने फक्त गुन्हा दाखल नको, तर आरोपींना अटकेचे आदेश व्हावेत अशी मागणी करण्यात आली होती.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रात्री यवत पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, फौजदार पद्मराज गंपले आणि संबंधित जमीन प्रकरणातील आरोपी पोपट तावरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भादंवि कलम १६७, १९२, १९९, १९८, १९७, २००, २१७, २१८, ४२०, ४०९, ४६४, ४१८, १२० (ब) यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री किरण शांताराम भोसले ( रा. जोगवडी, ता. बारामती) यांनी यवत पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक नारायण पवार हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
या प्रकरणात अॅड. राजेश कातोरे, अॅड. अमित काटे व त्यांचे सहायक संदीप येडे यांनी किरण भोसले व आरती लव्हटे यांच्या वतीने काम पाहिले. दौंडच्या न्यायदंडाधिकारी श्रीमती जे.एस. खेडेकर-गोयल यांनी यासंदर्भातील आदेश दिला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.