Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : मावळमध्ये पार्थ पवार यांच्या विरोधात प्रचार करणं ही ‘चूक’ : विजय शिवतारे

ह्याचा प्रसार करा

सासवड : प्रतिनिधी

एखाद्या मोठ्या नेत्याचा मुलगा जेव्हा एखादी निवडणूक लढवतो, त्यावेळी काही मर्यादा पाळायच्या असतात. मात्र पार्थ पवार हे मावळमधून निवडणूक लढवत असताना माझ्याकडून या मर्यादा पाळल्या गेल्या नाहीत. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशावरून मी मावळमध्ये विरोधात बोललो ही माझी राजकीय चूक होती, असं स्पष्टीकरण माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिलं आहे.

एकनाथ शिंदे गटाचे समर्थन केल्यानंतर विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवतारे यांनी सासवड येथील आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सत्ता असूनही माझ्या मतदारसंघात विकास प्रकल्प होत नाहीत म्हणून मी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले. यापुढेही आता त्यांच्यासोबत राहणार असल्याचे विजय शिवतारे यांनी यावेळी जाहीर केले.

मावळ मतदारसंघातून पार्थ पवार हे निवडणूक लढवत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनीच मला अजित पवार यांच्याविरोधात बोलण्यास सांगितलं होतं असे सांगून विजय शिवतारे म्हणाले, वास्तविक एखाद्या मोठ्या नेत्याचा मुलगा निवडणूक लढवत असेल तर काही मर्यादा पाळायच्या असतात. त्या माझ्याकडून पाळल्या गेल्या नाहीत. त्यांच्या विरोधात बोलणं ही माझी राजकीय चूक होती, असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.

मावळ निवडणुकीनंतर अजितदादांनी विजय शिवतारे कसा निवडून येतो हेच बघतो असं जाहीर वक्तव्य केलं. यात चुकीचं काहीच नव्हतं. त्यांचं म्हणणं बरोबरच होतं असे सांगून शिवतारे म्हणाले, शिवसेनेतील नेत्यांसाठी मी अजितदादांचा वाईटपणा घेतला. त्यामुळे मला पुरंदरमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं.         


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version