इंदापूर : प्रतिनिधी
वादळी वारे आणि पावसामुळे उजनी धरणात मंगळवारी बोट उलटून सहाजण बुडाले होते. आज पहाटेच्या सुमारास पाचजणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळाले. हे मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळं उपस्थितांसह अवघा उजनीकाठ हेलावून गेला. दरम्यान, सहाव्या व्यक्तीचा एनडीआरएफच्या पथकाकडून शोध सुरु असून उर्वरीत पाचजणांची ओळख पटवण्यात येत आहे.
मंगळवारी सायंकाळी इंदापूर तालुक्यातील कळाशी परिसरात उजनी पात्रात एक बोट उलटून सहाजण बुडाल्याची घटना घडली होती. यामध्ये गोकुळ दत्तात्रय जाधव, कोमल दत्तात्रय जाधव, शुभम गोकुळ जाधव, माही गोकुळ जाधव, अनुराग अवघडे आणि गौरव धनंजय डोंगरे हे सहाजण बुडाले होते. या घटनेची माहिती समजल्यानंतर तातडीने एनडीआरएफचे पथक बोलावण्यात आले होते.
काल या पथकाला नदीत बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली. दरम्यानच्या काळात बोटीत असलेली दुचाकीही मिळून आली होती. सायंकाळी उशीरापर्यंत या पथकाकडून मृतांचा शोध घेतला जात होता. मात्र अथक प्रयत्न करुनही मृतदेह हाती लागले नव्हते. त्यामुळे संबंधितांच्या नातेवाईकांचा संताप वाढला होता.
आज पहाटेच्या सुमारास पाचजणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. यामध्ये तीन पुरुष, एक महिला, एक लहान मुलाचा समावेश आहे. सहाव्या व्यक्तीचा एनडीआरएफ पथकाकडून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी संबधितांचे मृतदेह ताब्यात घेत ओळख पटवण्याचे काम सुरु केले आहे. शवविच्छेदन व इतर सोपस्कार पार पडल्यानंतर संबंधित मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.