आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

BIG BREAKING : दौंड हत्याकांडातील मृतदेहांचं पुन्हा होणार शवविच्छेदन; अंत्यविधी केलेले मृतदेह बाहेर काढले

पुणे
ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या दौंडमधील सामूहिक हत्याकांडातील तीन मृतदेहांचं पुन्हा एकदा शवविच्छेदन केलं जाणार आहे. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त होत असतानाच पवार आणि फुलवरे कुटुंबातील सातजणांचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता यातील तिघांच्या मृतदेहाचं पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले जाणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील पवार व फुलवरे कुटुंबातील सातजणांचे मृतदेह दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात आढळले होते. मोहन उत्तम पवार ( वय ४८ ), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८) आणि रितेश फुलवरे (७) कृष्णा फुलवरे (४) छोटू फुलवरे (३) अशी या मृतांची नावे आहेत. सुरुवातीला मुलाने नात्यातील मुलीला पळवून नेल्याच्या रागातून सामूहिक आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर यातील धक्कादायक सत्य समोर आले आहे.

आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूला मोहन पवार आणि त्यांचे कुटुंबीय जबाबदार असल्याच्या रागातून चुलत भाऊ अशोक कल्याण पवार याने बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले. विशेष म्हणजे या हत्याकांडात अशोक पवारसह श्याम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, व कांताबाई सर्जेराव जाधव या त्याच्या सख्ख्या भावा-बहिणीचा समावेश असल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या सर्वाना अटक करत पुढील तपास सुरु केला आहे. दौंड न्यायालयाने या सर्व आरोपींना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुसरीकडे, या प्रकरणाचे धागेदोरे मिळत नसताना ही सामूहिक आत्महत्येची घटना असावी असा अंदाज होता. त्यामुळे सुरुवातीला सापडलेल्या मृतदेहांवर अंत्यविधी करण्यात आला होता. मात्र आता हा खून असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दफन केलेले हे तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन केले जाणार आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us