
बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील प्रशासकीय भवनासमोर एका शेतकऱ्याने रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जमिनीच्या वादातून न्याय मिळत नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.
याबाबत माहिती अशी की, आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील रोहिदास जनार्दन माने या शेतकऱ्याने रॉकेल ओतून पेटवून घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादात न्याय मिळत नाही, अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही अशी या शेतकऱ्याची तक्रार आहे. त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
संबंधित शेतकऱ्याला बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. दुसरीकडे या शेतकऱ्याने यापूर्वी उपोषण करत प्रशासनाकडे आपली मागणी मांडली होती. तसेच इंदापूर तहसीलदारांकडे आत्मदहन करणार असल्याबाबत पत्रही दिले होते. मात्र प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. त्यातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचेही समोर आले आहे.