इंदापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे विहिरीवर काम करत असताना भीषण अपघात झाला. विहिरीला काँक्रिटने रिंग करण्याचे काम सुरू असतानाच काँक्रिटचा काही भाग विहिरीत पडला. त्याचवेळी आजूबाजूचा मलबा विहिरीत पडला. ढिगारा कोसळल्याने त्यात 4 मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचाव पथकाच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मासोबावाडी गावात ही घटना घडली. मासोबावाडी गावाजवळील एका विहिरीत रिंगिंग काँक्रिटचे काम सुरू असताना, गेल्या सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक काँक्रिटचा काही भाग विहिरीत पडला. विहिरीच्या आजूबाजूला ढिगारा आल्याने विहिरीत काम करणारे ४ मजूर ढिगाऱ्यात गाडले गेले. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सीलाल चव्हाण, मनोज मारुती चव्हाण हे विहिरीत काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रात्री उशिरापर्यंत मजूर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी विहिरीजवळ पाहिले असता चार मजुरांची वाहने तेथे होती व विहीर पूर्णपणे ढिगाऱ्याने झाकलेली होती. त्यानंतर प्रशासनाला कळवण्यात आले, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत जेसीबी पोकलेन मशिनने डेब्रिज हटवण्याचे काम सुरू होते. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून, रात्री उशिरापर्यंत मजुरांना शोधण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, आज सकाळपासून माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.. त्यांनी प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधत मदतकार्याला गती देण्याच्या सुचना केल्या..