
पुणे : प्रतिनिधी
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलानजीक भूमकर पुल येथे एका अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये एका कंटेनरने पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात चौघेजण जखमी झाले असून आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भूमकर पुलावरुन एक कंटेनर जात होता. त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं समोर असलेल्या एका पीकअपला जोरदार धडक बसली. त्या पाठोपाठ शिवशाही बस, एक ट्रक आणि दोन कार अशा वाहनांना धडक बसली. ही धडक अत्यंत जोरदार होती, त्यामध्ये पीकअपच्या पाठीमागील छत निखळून पडले. याच घटनेत दोन कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर विविध वाहनातील चौघेजण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातानंतर या महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी तात्काळ यंत्रणा लावत वाहतूक सुरळीत केली.