पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यामुळंच ते कामातील चुकांवर अधिकाऱ्यांची जागेवरच कानउघडणी करत असतात. आजही त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. मला बोलवताना अधिकाऱ्यांनी विचार करावा. मी कौतुक करेन की तुमच्या कामाचा पंचनामा करेन याकडे लक्ष द्या अशा शब्दात त्यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना फटकारले.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात गोवंश २०२२ प्रदर्शनाचं उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. या प्रदर्शनाची पाहणी करताना अजितदादांनी अधिकारी वर्गाची चांगलीच खरडपट्टी काढली
प्रदर्शनाच्या ठिकाणी असलेल्या गोठ्याच्या दुरवस्थेवरुन अजितदादांनी अधिकाऱ्यांना सुनावले. तुम्ही अधिकारी वर्ग काय करताय असं विचारत मला बोलवायचे असेल तर दहावेळा विचार करत जा. मी कोणाचं कौतुक करेल की तुमच्या कामाचा पंचनामा करेल हे सगळं लक्षात घेवून काम करत चला.
तुम्ही माझा काटेवाडीचा गोठा येवून पहा किंवा माळेगावचा गोठा बघा. त्यातून तुम्हाला लक्षात येईल गोठा कसा असतो तो कसा ठेवतात. उगाच काहीतरी करायचं म्हणून करु नका असा सज्जड दमच अजितदादांनी यावेळी दिला. त्यामुळं प्रदर्शनाचं आयोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.