नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे खाकी वर्दीचा मान कमी करणारी एक घटना घडली आहे. एका मद्यधुंद पोलिसाने चक्क स्वत:च्या कारने एका आयशर टेम्पोला धडक दिली. स्वत:ची चूक असल्यामुळे आणि लोकांची गर्दी झाल्यामुळे त्याने टेम्पोला जाऊ दिले. मात्र पुढे सापळा रचून या टेम्पोचालकाला पकडून कोणत्याही कारवाईशिवाय सोडून दिले. त्यामुळे नीरेत पोलिसांचं नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
मंगळवारी सायंकाळी नीरा पोलिस चौकीतील पोलीस कर्मचारी राजेंद्र भापकर हे आपल्या सातारा पासिंग असलेल्या क्वीड कारने लोणंदकडे निघाले होते. त्यावेळी त्यांनी लोणंदकडून येणाऱ्या आयशर टेम्पोला विरुद्ध दिशेने धडक दिली. ही घटना पाहत असलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ भापकर यांना कारमधून बाहेर काढले. मात्र पोलिस कर्मचाऱ्यांची अवस्था पाहून सर्वच अचंबित झाले. दोन्ही वाहनातील कोणीही जखमी झाले नसल्यामुळे व पोलिस कर्मचाऱ्यांची चूक असल्याने संबंधित टेम्पो चालकाला जाण्यास सांगितलं गेलं.
पुढे मात्र नीरा पोलिसांनी हा टेम्पो वाल्हा हद्दीत अडवत चालकाला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्याच्याकडून नुकसान भरपाई घेऊन हा टेम्पो सोडून देण्यात आला. या संपूर्ण घटनेची काल दिवसभर नीरा शहरात खमंग चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे नुकसानभरपाईपोटी मोठी तडजोड केल्याचंही बोललं जात होतं. हेच कमी की काय म्हणून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या नशेतील कारनाम्याचीही चर्चा रंगली होती.
दरम्यान, या घटनेबाबत आता वरिष्ठ पोलिस अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित कर्मचाऱ्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. विशेष म्हणजे मला कोणी काही करू शकत नाही अशाच आविर्भावात हा कर्मचारी असतो. त्यामुळे आता नीरेत झालेल्या राड्यानंतर वरिष्ठ याची दखल घेतात का याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.