Site icon Aapli Baramati News

Big Breaking : कानगावमध्ये ११ वर्षीय मुलीवर अत्याचार; यवत पोलिसांनी केला गुन्हा दाखल

ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी

मारण्याची धमकी देत दौंड तालुक्यातील कानगाव येथे एका ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

मयूर पांडुरंग फडके (रा. कानगाव, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयूर हा पिडीत मुलीच्या घरात कोणी नसल्याचे पाहून वारंवार तिची छेड काढत होता. मागील तीन महिन्यांपासून त्याने या मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

याबद्दल कुणाला काही सांगितले तर तुला मारीन अशी धमकीही तो देत होता. तसेच तिला पैसे देण्याचे आमिष दाखवत असे. विशेष म्हणजे घरात कुणी नसल्याचाही तो वेळोवेळी गैरफायदा घेत होता.  या दरम्यान, कुटुंबीयांनी या मुलीला आरोपीशी बोलताना पाहिले. त्यावेळी तू काय बोलत होतीस अशी विचारणा तिच्याकडे केली. त्यावर तिने आतापर्यंत झालेली घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यावरुन संबंधित कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

यवत पोलिसांनी या प्रकरणी मयूर फडके याला अटक करत त्याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.      


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version