पुणे : प्रतिनिधी
तब्बल वीस वर्षानंतर डबल-डेकर बस पुण्यातील रस्त्यांवर धावणार आहेत.पीएमपीने डबल-डेकर बस ताफ्यात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांना प्रदीर्घ कालावधीनंतर जुने दिवस अनुभवता येणार आहेत.
गेल्याच महिन्यात डबल डेकर बस कंपनीच्या प्रतिनिधींनी पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यामध्ये इलेक्ट्रिक डबल-डेकर बसबद्दल आणखी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे असे पीएमपीएलमधील सूत्रांनी सांगितले.
सहव्यवस्थापकीय संचालिका चेतना केकुरे यांनी या नवीन बस घेण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. डबल डेकर बसमध्ये इतर बसपेक्षा जास्त आसन क्षमता असते. बहुतांशी या बस असल्याने इलेक्ट्रिक असल्याने पर्यावरणाची हानी कमी होते. सध्या पीएमपीच्या ताफ्यामध्ये १५० इलेक्ट्रिक बस आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील डबल डेकर बसबाबत विचार सुरू केला आहे. या बस सुरु करण्यासाठी मार्गांसोबत इतर गोष्टी ठरवणे आवश्यक आहे. या बस खाजगी कंपनी चालवतील, असा मतप्रवाह आहे. पीएमपी आवश्यक सुविधा पुरवणार आहे. या विशिष्ट मार्गाने या बस धावतील, जेणेकरून अपघात कमी होतील असे सूत्रांनी सांगितले.