
दौंड : प्रतिनिधी
दौंड पोलिस ठाण्याचा कार्यभार पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी घेतला आहे. कार्यभार घेताच त्यांनी कामाचा धडाका सुरू केला असून आज दौंड तालुक्यातील मलठण येथील बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईत १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलठण येथे भीमा नदीकाठी बेकायदेशीर दारू बनवली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलिस हवालदार विनोद चव्हाण, महेंद्र लोहार, नारायण वलेकर, पोलिस नाईक अमोल गवळी, किशोर वाघ, अमोल देवकाते यांनी या परिसरात जाऊन बेकायदेशीर दारु अड्ड्यांवर छापा टाकला. या कारवाईमध्ये दारू गाळण्यासाठीचे बॅरल, प्लॅस्टिक बॅरल, १६०० लीटर कच्चे रसायन, १० लीटर हातभट्टी दारू असा जवळपास १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी नारायण वलेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईची माहिती मिळताच संबंधित दारू बनवणाऱ्यांनी पोबारा केला. अधिक तपास पोलिस हवालदार विनोद चव्हाण करीत आहेत.