पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थीनीला बारावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी महाविद्यालयातील शिपायाने एक विचित्र मागणी केली आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी विनोद बाबासाहेब चव्हाण या आरोपी शिपायाला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी ही अभिमान कॉलेजमध्ये ११ वी कॉमर्स या वर्गात शिक्षण घेत आहे. विनोद चव्हाण हा या महाविद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याने या विद्यार्थीनीला तिच्या मोबाईलवर संपर्क साधत तुला बारावी परिक्षेत पास होण्यासाठी मदत करेन. त्यासाठी तू मला हवी आहेस अशी विचित्र मागणी केली.
या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग पीडित मुलीने आपल्या मोबाईलमध्ये केली आहे. या प्रकारानंतर संबंधित मुलीने आपल्या कुटुंबियांना याबद्दल माहिती दिली. त्यानुसार निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निगडी पोलिसांनी विनोद चव्हाण याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून संबंधित शिपायावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.