Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई; ३८ गुन्ह्यात सहभाग असलेल्या चौहान टोळीवरही ‘मोक्का’

ह्याचा प्रसार करा

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी         

पिंपरी चिंचवड शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आता मोक्काअंतर्गत कारवाईवर भर दिला आहे. आज पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३८ गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या चौहान टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मागील सात महिन्यांत २१ संघटित टोळ्यांमधील २०९ गुन्हेगारांवर ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी परिसरात चौहान टोळीने आपल्या गुन्हेगारी कारवायांमुळे प्रचंड दहशत निर्माण केली होती. या टोळीवर आजवर ३८ गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलिसांनी टोळी प्रमुख अमर उर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहान (वय २६, रा. नेहरुनगर, पिंपरी), साहिल सुधीर धनवे (वय २०), रोहित प्रविण धनवे (वय २०, दोघे रा. महेशनगर, पिंपरी), अक्षय अण्णा रणदिवे (वय २९, रा. एमआयडीसी, भोसरी) यांना अटक करत मोक्काची कारवाई केली आहे. तर, सोन्या रणदिवे (रा. नेहरुनगर, पिंपरी) याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

चौहान टोळीतील आरोपींच्या विरोधात पिंपरी, पुणे शहर परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, कट रचणे, पुरावा नष्ट करणे, अपहरण, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खंडणी, दुखापत करणे, वाहनांची तोडफोड अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर टोळीतील अमर चौहान याच्यावर स्वतंत्रपणे १२ गुन्ह्यांची नोंद आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्‍त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्‍त बाळासाहेब कोपनर, सतिश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, राम राजमाने, सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, अनिल गायकवाड, दत्ताजी कौठेकर यांच्या पथकाने केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version