Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : लग्नानंतर अवघ्या दिड महिन्यात पत्नीनेच काढला पतीचा काटा; गहुंजेतील खून प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

सासरवाडीत आलेल्या जावयाची अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे रविवारी घडली होती. या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. पत्नीनेच आपल्या पतीचा खून केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पतीच्या जाचाला कंटाळून तिने हत्या केल्याची बाब पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे.

याबाबत तळेगाव पोलिसांनी मयत सूरज काळभोर याची पत्नी अंकिता काळभोर हिला अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, रविवारी दि. ४ जून रोजी सूरज काळभोर या सासरवाडीत आलेल्या जावयाचा अज्ञात व्यक्तींनी धारदार कोयत्याने गळा चिरून खून केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर तळेगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत संबंधितांचे जाबजबाब घेण्यास सुरुवात केली होती.

घटनास्थळी पत्नी अंकिता ही हजर असल्यामुळे पोलिसांनी तिची उलटतपासणी घेतली. त्यामध्ये तिने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. पती सूरज हा लग्नानंतर सातत्याने शारीरीक व मानसिक छळ करत होता. त्यामुळे अंकिताने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांना सांगितले. शनिवारी सूरज आणि अंकितामध्ये वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या अंकिताने सुरजचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

रविवारी सकाळी हे दोघे पती-पत्नी आकुर्डी येथील आपल्या घरापासून गहुंजे येथे म्हणजेच अंकिताच्या माहेरी निघाले. त्याचवेळी अंकिताने घरातील सुराही सोबत घेतला होता. या दोघांनी प्रति शिर्डीत साई बाबांचं दर्शन घेत आपला प्रवास सुरू केला. दुपारी हे दोघेही घरी जाण्यापूर्वी गहुंजे येथील शेतात पोहोचले. त्या ठिकाणी अंकिताने लघुशंकेला जात असल्याचा बहाणा केला. त्या दरम्यान, सूरज हा बेसावध असल्याचे पाहून तिने आपल्याकडील सूऱ्याने सूरजचा गळा चिरला आणि त्याला ढकलून दिले.

सूरज जमिनीवर कोसळल्यानंतर अंकिताने त्याच्या डोक्यात शेतातील टिकाव आणि दगड घातला. त्यामध्ये सुरजचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अंकिताने अज्ञात लोकांनी सुरजची हत्या केल्याचा बनाव रचला. मात्र तिच्या जबाबात विसंगती आढळल्यानंतर पोलिसांनी उलटतपासणी केली. त्यामध्ये अंकिताच्या कृत्याचा पर्दाफाश झाला. दरम्यान, अंकिताच्या या कृत्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version