आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पिंपरी

किरकोळ वादातून डोक्यात फोडली बाटली, गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना

पिंपरी
ह्याचा प्रसार करा

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

किरकोळ शाब्दिक वादातून तरुणाच्या डोक्यात बाटली फोडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरातील भोसरीमध्ये घडली आहे. मित्राच्या वाढदिवसानिमित्त एका हॉटेलमध्ये १० ते १५ मित्र जेवणासाठी गेले होते. त्यातील काही मित्रांसोबत बाचाबाची झाल्याने , यातून राग अनावर झालेल्या मित्राने तरुणाच्या डोक्यात बाटली फोडून हत्या केली. रविवारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

आतीक सय्यद (वय २७ रा.चक्रपाणी वसाहत ,भोसरी) असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक हा मित्राच्या वाढदिवसानिमित्त १० ते १५ मित्रांसह एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. जेवण आटोपल्यानंतर सर्व मित्र हॉटेलच्या बाहेर पडले. यावेळी त्यामधील चार मित्रांसोबत अतिकची शाब्दिक बाचाबाची झाली. या शाब्दीक बाचाबाचीचे रूपांतर वादात झाले.

या वादाच्या रागातून चार तरुणांमधील एकाने अतिकच्या डोक्यात बाटली फोडत हल्ला चढवला. या हल्ल्यात अतीक गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या अतिकला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत अतिकला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित एका संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.


ह्याचा प्रसार करा
पिंपरी
Back to top button
Contact Us