पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी ही घटना घडली असून गॅस लिकेजमुळे जलतरण तलावात पोहण्यासाठी आलेल्या २० ते २२ जणांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला आहे. तर काहीजण बेशुद्ध पडल्याचंही समोर आलं आहे. या घटनेनंतर या परिसरात क्लोरिन गॅस पसरून नागरिकांनाही त्रास सोसावा लागला.
याबाबत माहिती अशी की, आज सकाळी कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात नेहमीप्रमाणे नागरीक पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक तलावात क्लोरिन गॅस लिक झाला. त्यामुळे काहीजणांना श्वास घेण्यात त्रास झाला. तर काहीजण बेशुद्ध पडल्याचं समोर आलं आहे. यापैकी जवळपास ११ ते १२ जणांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर परिसरात क्लोरीन गॅस पसरून जवळपासच्या अंतरावर असलेल्या नागरिकांना खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होऊ लागला आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलासह पोलिस यंत्रणेने या तलावाकडे धाव घेत मदतकार्य राबवले. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या जलतरण तलावात ही घटना घडल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा नेमकं काय करते असा सवाल उपस्थित होत आहे.