पुणे : प्रतिनिधी
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे राज्यात ओमीक्रॉनने शिरकाव केला आहे. राज्यात लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात मंगळवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेत लसीकरण, कोरोना नियमांची अंमलबजावणीबाबत सूचना केल्या. त्याचवेळी त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्यासाठी भाग पाडू नका, असा इशाराही दिलाय.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य शासनानेही विविध निर्बंध लागू केले आहेत. पुण्यातही नव्याने काही निर्णय घेण्यात आले आहेत. पुण्यात जर कोणी विनामास्क फिरताना दिसुन आले तर ५०० रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. मास्क नसताना थुंकल्यास १०० ० रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. केवळ ७४ टक्के पुणेकरांनी लशीचा दुसरा डोस घेतला आहे, उरलेल्या लोकांनी लवकरात लवकर डोस घ्यावा. पुणेकरांनी मला टोकाचा पाऊल उचलायला लावू नये असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
रंगीत मास्क न वापरता थ्री फ्लायर, एन -९५ मास्कचा वापर नागरिकांनी करावा. हॉटेल, शासकीय कार्यालयांमध्ये दोन डोस न घेतलेल्यांना प्रवेश मिळणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. लसीकरणात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा. लस घेतल्यामुळे कोरोनाचा धोका कमी प्रमाणात जाणवतो. त्यामुळे नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन करतानाच त्यांनी कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका असं ठणकावलं आहे.