नाशिक : प्रतिनिधी
अगोदरचे सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नव्हते. विद्यमान सरकारदेखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नाही. विरोधी पक्षातील नेते नोटिसांमुळे भेदरलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी पाठीराखा राहिला नाही, असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी विरोधी पक्षांवर चढवला.
मनमाड येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, अगोदरचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नव्हते. विद्यमान सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उजव्या हाताने मारायचे आहे की डाव्या हाताने मारायचे . असा प्रश्न पडलाय, असे राजू शेट्टी म्हणाले.
यंदा राज्यात सगळीकडे जास्त पाऊस पडला. त्यामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती असताना देखील राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही. विरोधी पक्षातील नेते गप्प आहेत. ते नोटिसांमुळे भेदरले आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कोणीच पाठीराखा राहिला नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.