Site icon Aapli Baramati News

नंदीग्राम : मतमोजणीत छेडछाड..? पुन्हा मतमोजणीसाठी ममता दीदी न्यायालयात जाणार

ह्याचा प्रसार करा

कोलकाता : वृत्तसंस्था

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल कॉँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. मात्र त्या स्वत: नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीत छेडछाड झाल्याचा संशय व्यक्त करत फेर मोजणीसाठी न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार ताकद लावल्यानंतरही ममता बॅनर्जी यांनी निर्विवाद सत्ता हस्तगत केली. मात्र त्या स्वत: नंदीग्राममधून पराभूत झाल्या आहेत. भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांनी १९५३ मतांनी त्यांचा पराभव केला. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आपण निकाल मान्य केल्याचे स्पष्ट केले. मात्र या निवडणूक निकालात काहीतरी छेडछाड केल्याचा संशय असून त्याबद्दलची माहिती आपल्याकडे आली आहे. याबाबत न्यायालयात जाणार असून यातील सत्य समोर आणणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

नंदीग्राममधील जनतेने जो कौल दिला तो मी स्वीकारते. आमच्या पक्षाने २२१ हून अधिक जागा जिंकल्या असून भाजप या निवडणुकीत पूर्णपणे पराभूत झाला आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

हा तर रडीचा डाव : शरद पवार

शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपलाही रडीचा डाव म्हणत चिमटा काढला आहे. बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल! असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version