मुंबई : प्रतिनिधी
दिशा सालियनच्या मृत्यूबाबत वारंवार आरोप करणाऱ्या राणे पिता पुत्रांविरोधात सालियन कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून सालीयान कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्रांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राणे पिता-पुत्रांसमोरील अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिशाच्या मृत्यूवरून राणे पिता-पुत्र राजकारण करत आहेत, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे. दिशाचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. त्याचबरोबर त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणाशी सचिन वाझे यांचा संबंध असल्याचा आरोप केला होता.
राणेंच्या या आरोपानंतर त्यांच्या कुटुंबियांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांच्यावर मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, राणे पिता-पुत्रांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. काही अटींवर न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.