मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी हल्ल्यापूर्वी एसटी कर्मचारी व आंदोलकांनी रेकी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. कालच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन केलं. या दरम्यान पवार यांच्या घरावर दगड आणि चप्पल फेकल्याचे समोर आले होते. त्यातच काही कर्मचाऱ्यांकडून घरावर हल्लाही करण्यात आला. या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०७ संशयितांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे या घटनेपूर्वी एसटी कर्मचारी व आंदोलकांनी सिल्वर ओक परिसराची रेकी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.
सिल्वर ओकवर झालेला हल्ला पूर्वनियोजित पद्धतीने केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अशातच या परिसराची रेकी केल्याचे समोर आल्यामुळे या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे