मुंबई: प्रतिनिधी
अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान काही महिन्यापूर्वी क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात सापडला होता. याप्रकरणी अमली पदार्थ नियंत्रक विभागाचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या प्रकरणात आर्यन खानवर कारवाई केली होती. या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारा पंच प्रभाकर साईल यांचे शुक्रवारी ( दि.१ एप्रिल) अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
पंच प्रभाकर साईलच्या अचानक झालेल्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या मृत्यू प्रकरणी अनेक संशयास्पद प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पंच प्रभाकर साईलच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
पंच प्रभाकर साईल यांनी आर्यन खान ड्रग्स प्रकरणात केलेल्या खुलाशामुळे प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली होती. त्यामुळे त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.मात्र त्यांच्या पत्नी पूजा साईलने प्रभाकर साईल यांचा मृत्यू नैसर्गिक झाला असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.