मुंबई : प्रतिनिधी
पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केल्यानंतर मुंबई पोलिसांनी व्हिडीओ शेअर करत खासदार नवनीत राणा यांचा खोटारडेपणा सिद्ध केला होता. त्या पाठोपाठ माध्यमांसमोर शिवसैनिकांच्या हल्ल्यात गंभीर इजा झाल्याचे दाखवणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांचीही पोलखोल करण्यात आली आहे. या हल्ल्याचा वैद्यकीय अहवाल भाभा रुग्णालयाने सादर केला असून त्यात सोमय्यांना मोठी दुखापत झाली नसल्याचे समोर आले आहे.
शनिवारी शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. माध्यमांसमोर त्यांनी आपल्या गालावर जखम झाल्याचे दाखवले होते. इतकेच काय तर थेट केंद्रीय गृह मंत्रालयात याबद्दल तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र आता सोमय्या यांचा दावाच खोटा असल्याचे समोर आले आहे.
हल्ल्यानंतर भाभा रुग्णालयात किरीट सोमय्या यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. रुग्णालयाने या वैद्यकीय तपासणीचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार सोमय्यांना फक्त ०.१ सेंटीमीटरची जखम होती. सोमय्यांना मोठी दुखापत झाली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांना सूज किंवा रक्तस्त्रावही झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सोमय्यांचा हा दावाही खोटा ठरला आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या यांच्या जखमेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी टोमॅटो सॉस लावला असावा, असेही राऊत म्हणाले होते. त्यानंतर आता रुग्णालयाच्या अहवालातच कसलीही जखम नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे किरीट सोमय्या यांच्या ‘त्या’ दाव्यातील हवाच निघून गेली आहे.