मुंबई : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवरून राज्य सरकारसह राज्यातील नेत्यांवर टीका केली. त्यानंतर भाजपनेही त्यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानं चर्चा झडू लागल्या आहेत. मात्र या भेटीमागे नेमकं काय राजकारण होतं हे स्वत: गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. राज्य सरकारमधील दिग्गज नेत्यांवर त्यांनी टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी मशिदीवरील भोंग्याबाबतही वक्तव्य केले होते.त्यांच्या या भाषणावरून राज्य सरकारमधील नेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. भाजपने त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. परंतु नितीन गडकरी यांनी स्वतः या भेटीमागचे ‘राज’ कारण सांगितले आहे.
गेल्या तीस वर्षापासून माझे राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत. त्यांचे केवळ नवीन घर पाहण्यासाठी आणि राज ठाकरे यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी मी गेलो होतो. परंतु या भेटीमागे कोणतेही राजकिय कारण नाही.या भेटीकडे कौटुंबिक स्नेहभेट म्हणून बघता येईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.