Site icon Aapli Baramati News

उत्तर सभेत तलवार दाखवणं भोवलं; राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

ह्याचा प्रसार करा

ठाणे : प्रतिनिधी

ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत जाहिररित्या तलवारीचं प्रदर्शन करणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना भोवलं आहे. या प्रकरणी ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मनसे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी या संदर्भात माहिती दिली. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडकरी चौक येथे मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान अध्यक्ष राज ठाकरे यांनी तलवार दाखवली. या प्रकरणी त्यांच्यावर भा.दं.वि कलम ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्यासह ठाणे आणि पालघर जिल्हा मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश अनंत जाधव, मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. याच सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला होता.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version