
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरूच आहेत.दरम्यान त्यातील काही मागण्या मान्य केल्या असून विलिनीकरणाची त्यांची ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे हे कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. राज्य सरकारने त्यांना वारंवार आवाहन करूनही त्यांनी संप मागे घेतला नाही. आज पुन्हा एकदा उच्च न्यायालयात या संपाबाबत सुनावणी होणार आहे.
उच्च न्यायालयासमोर एसटी महामंडळाने याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु अंतिम निर्णय घेत असताना कामगारांची बाजू ही ऐकून घेणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण न्यायालयाने दिले आहे. परंतू काल ॲड. डॉ. गुणरत्न सदावर्ते गैरहजर असल्याने आज त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीकडे आज एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या राज्य परिवहन महामंडळ तोट्यात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढी सारख्या इतर मागण्या मान्य होत नाही. महामंडळ तोट्यात असल्याचे कारण देत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. त्यामुळे या राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे.