
मुंबई : प्रतिनिधी
एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गिरगाव न्यायालयाने त्यांना १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यामुळे दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे पोलिसांनी आज गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात हजर केले होते. त्यामध्ये सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ११ दिवसांची कोठडी मागितली होती. सदावर्ते यांच्या कॉल डिटेल्समध्ये अनेक बाबी संशयास्पद आढळल्या असून त्यांनी एसटी कामगारांकडून मोठी रक्कम जमा केली आहे. त्यामुळे या गोष्टींचा तपास होणे आवश्यक असल्याने कोठडी द्यावी अशी मागणी घरत यांनी केली होती.
सरकारी वकिलांच्या युक्तीवादानंतर सदावर्ते यांच्या वकिलांनीही बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या दोन दिवसांत आणखी महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता असून त्यानंतर सदावर्ते यांच्यापुढील अडचणीत वाढ होणार आहे.