मुंबई : प्रतिनिधी
एका १९ वर्षीय मनोरुग्ण मुलीचा जन्मदात्या आईनेच गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना अंधेरीत घडली आहे. या घटनेच्या तपासादरम्यान, आईने आत्महत्येचा बनाव रचून हा खून केल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंधेरीतील एका मनोरुग्ण मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. संबंधित मुलीच्या आईने याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सर्व प्रक्रिया पूर्ण करत संबंधित युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. ही आत्महत्या नसून खून केल्याचे या अहवालातून समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता जन्मदात्या आईनेच हा खून केल्याचे स्पष्ट झाले. या मुलीच्या आईनेही तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे. अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करत या निर्दयी आईला अटक केली आहे.